आधारमधील अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावत (MBU) – शालेय विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम युआयडीएआय कडून शालेय विद्यार्थ्यांचे अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावत वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 5 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत एमबीयुसेवा विनामूल्य उपलब्ध आहे. या उपक्रमासाठी युआयडीएआयने Unified District Information System for Education Plus (UDISE+) सोबत तांत्रिक एकात्मिकरण केले आहे. यामुळे शाळांना विद्यार्थ्यांच्या एमबीयु स्थितीची माहिती उपलब्ध होते. या उपक्रमाच्या माध्यमातून युआयडीएआयने देशभरातील सुमारे 1.6 लाख शाळांमधील 2 कोटींहून अधिक शालेय विद्यार्थ्यांचे एमबीयु पूर्ण करण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. पाच वर्षांखालील मुलांच्या आधार नोंदणीच्या वेळी त्यांची लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि छायाचित्र घेतले जाते. मात्र, त्या वयात बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या बुबुळांची (Iris) बायोमेट्रिक माहिती घेतली जात नाही, कारण या वयात ही बायोमेट्रिक वैशिष्ट्ये अद्याप विकसित होत असतात. त्यामुळे मुलाच्या आधारमध्ये बायोमेट्रिक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी एमबीयु करणे आवश्यक आहे. मुलाचे वय 5 वर्षे पूर्ण झाल्यावर आणि त्यानंतर 15 वर्षे पूर्ण झाल्यावर अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक आहे. योग्य वेळी एमबीयु पूर्ण केल्यामुळे शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रवासात तसेच आधार प्रमाणीकरणाची आवश्यकता असलेल्या विविध सेवा आणि लाभांचा वापर करताना आधार प्रमाणीकरणाचा अनुभव अधिक सुरळीत होण्यास मदत होते. एमबीयु वेळेवर पूर्ण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि ही सेवा अधिक सुलभ करण्यासाठी युआयडीएआयने 1 ऑक्टोबर 2025 पासून 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एमबीयु शुल्क एका वर्षाच्या कालावधीसाठी माफ केले आहे. तसेच, 5 ते 7 वर्षे आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एमबीयु आधीपासूनच विनामूल्य आहे. त्यामुळे, 5 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी एमबीयु सेवा 30 सप्टेंबर 2026 पर्यंत पूर्णपणे विनामूल्य आहे. आधारमध्ये अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावत (MBU) न केल्यास विविध शासकीय योजनांतर्गत लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण करताना अडचणी येऊ शकतात. तसेच, NEET, JEE, CUET इत्यादी स्पर्धात्मक तसेच विद्यापीठस्तरीय परीक्षांसाठी नोंदणी करतानाही अडचणी उद्भवू शकतात. युआयडीएआयकडून पालक आणि पालकत्वाची जबाबदारी असलेल्या व्यक्तींना आपल्या मुलांच्या आधारमधील अनिवार्य बायोमेट्रिक अद्ययावत (MBU) वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.